18 March, 2024

आचारसंहिता काळात शासकीय परिसरात मिरवणुका, घोषणा व सभा आयोजनास निर्बंध

हिंगोली, दि.18 : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात मिरवणुका काढणे, घोषणा तसेच सभा घेण्यास निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत. हे आदेश 6 जूनपर्यंत अंमलात राहणार आहेत. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी निवडणूक कार्यक्रम 16 मार्च रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त, न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणे, निवडणुकीसंदर्भातील पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग्स लावणे, निवडणूकविषयक घोषवाक्य लिहिणे, आवारात निवडणूकविषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे तसेच निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल,अशी कृती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 6 जूनपर्यंत निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी श्री. पापळकर यांनी दिले आहेत. *****

No comments:

Post a Comment