10 January, 2025
मुलींचे शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या हक्कांना प्राधान्य देणे सर्वांची जबाबदारी - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 10 : स्त्री-पुरुषात समानता आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. “मुलगी शिकली, प्रगती झाली” हे केवळ नारा न राहता तो आपल्या आचरणात उतरवण्याची वेळ आली आहे. मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या हक्कांना प्राधान्य देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आयोजित बैठकीत सर्व संबंधिताना दिल्या.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नुकतीच जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गोपाल कदम, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. मनीष बगडीया, विधी समुपदेशक ॲड. सुकेशिनी ढवळे उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी पीसीपीएनडीटी कार्यक्रमाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील, तालुक्यातील लिंग गुणोत्तर प्रमाण याची माहिती दिली. तसेच एखाद्या ठिकाणी लिंग निदान करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाल्यास ती शासनास 104 व 18002334475 या टोल फ्री क्रमांकावर तसेच http://amchimulgi.maha.in या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार करता येते. माहिती कळविणाऱ्यास शासनाकडून खबरी बक्षीस म्हणून एक लाख रुपये देण्यात येते. याबाबत माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जात असल्याची माहिती दिली.
******
No comments:
Post a Comment