16 January, 2025
शासकीय सेवा, योजना अंमलबजावणी शिबिराचे रविवारी आयोजन
• न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी, न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती
हिंगोली, दि.16,(जिमाका): राज्य शासनाच्या विविध शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिराचे रविवारी (दि. 19) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
विविध शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी, तालुका विधी सेवा समिती हिंगोली आणि कळमनुरी तसेच जिल्हा प्रशासन परभणी आणि हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या महाशिबिराच्या ठिकाणी राज्य शासनाच्या विविध योजनांची आणि सेवांची माहिती, त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शासकीय सेवा आणि योजनांच्या मेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनांचा समावेश आहे.
आहार आरोग्य शिक्षण, पूर्वप्राथमिक शिक्षण,आरोग्य तपासणी, लसीकरण, पूरक पोषक आहार व संदर्भ सेवा, गरोदर, स्तनदा माता समुपदेशन योजना या महिला व बालविकास विभागाच्या योजनांचा समावेश असून, महिला आर्थिक विकास महामंडळ, तहसील कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या प्रधानमंत्री पीकविमा, कृषि सिंचन योजना, किसान सन्मान निधी योजनांचा समावेश आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्या योजनांसह वन विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या योजना, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभाग, समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा समितीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा व सल्ला, मनोधैर्य योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि पीडितांसाठीच्या योजनांची माहिती या महामेळाव्यात मिळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सदस्य सचिव श्रीमती अर्चना तामणे, दिवाणी न्यायाधीश क. स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळमनुरीचे श्री. एस. पी. पांडव आणि तालुका वकील संघाचे ॲड. श्री. टी. पी. देशमुख यांनी केले आहे.
*****
No comments:
Post a Comment