18 January, 2025
शासकीय सेवा, योजना अंमलबजावणी महाशिबिराचे आज कळमनुरी येथे आयोजन
• न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी, न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती
हिंगोली (जिमाका), दि. 18 : राज्य शासनाच्या विविध शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आणि अंमलबजावणी महाशिबिराचे उद्या रविवारी (दि. 19) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी यांच्या हस्ते कळमनुरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सकाळी साडेनऊ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
विविध शासकीय सेवा व योजनांच्या महाशिबिराला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती यनशीवराज खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणीच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर आणि जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी, तालुका विधी सेवा समिती हिंगोली आणि कळमनुरी तसेच जिल्हा प्रशासन परभणी आणि हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने हे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या महामेळाव्याचा मुख्य विषय आदिवासी विकास आणि आरोग्य हा आहे. या व्यतिरिक्त समाजातील इतर दुर्बल, वंचित घटकांना शासकीय कार्यालयातील विविध लोककल्याणकारी योजनांची जनजागृती करणे, योजनांचा लाभ मिळविण्यासाठी कायदेविषयक मदत करणे हा या शिबिराचा उद्देृश आहे. तसेच परभणी व हिंगोली जिल्ह्यातील विविध शासकीय व निमशासकीय विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सेवा व योजनांची माहिती तसेच लाभ देण्यासाठी या महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी या महाशिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनांची माहिती करुन घ्यावी व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणीच्या अध्यक्षा उज्वला एम. नंदेश्वर आणि सचिव श्रीमती अर्चना तामणे यांनी केले आहे.
*******
No comments:
Post a Comment