03 January, 2025
हिंगोली उपविभागातील गौण खनिज, रेती वाहतूकदारावर जप्तीची कारवाई
हिंगोली (जिमाका), दि. 03 : जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या पथकाद्वारे सेनगाव तालुक्यातील चिखलागर येथे गोपनीय माहितीवरुन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार सेनगाव यांच्या कार्यालयाचे कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांच्या समवेत जाऊन पाहणी केली असता चिखलागर येथे गौण खनिज उत्खनन केले असल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन नदीपात्रातील साहित्य जप्त करण्यात आले. तसेच सेनगाव तालुक्यातील सर्व नदीपात्रातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.
माहे सप्टेंबर, 2024 पासून हिंगोली व सेनगाव तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरुध्द उपविभागीय अधिकारी यांनी स्वत: गौण खनिज उत्खनन स्थळी जाऊन दोन मोठ्या कारवाया करत गौण खनिज साहित्य नष्ट करण्यात आले आहे. हिंगोली तालुक्यातही अवैध वाहतूक करणारे वाहन पकडून शासन नियमानुसार दंड वसुलीची कार्यवाही केलेली आहे.
भविष्यात उपविभागात अनाधिकृतरित्या होणारे गौणखनिज (रेती, मुरुम, दगड) उत्खनन व वाहतूक पूर्णपणे बंद करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. अशा कार्यवाहीमुळे अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा बसविण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, यासाठी प्रशासनाद्वारे प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली आहे.
******
No comments:
Post a Comment