27 February, 2025

अन्न व्यावसायिकांना अन्न परवाना, नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक

हिंगोली (जिमाका), दि. 27 : अन्न व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 31 अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करणे कायद्याच्या कलम 63 अन्वये दंडनीय गुन्हा आहे.त्यामुळे सर्वांनी नोंदणी व अन्न परवाना प्रमाणपत्र काढून घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 मध्ये अन्न व्यावसायिकाची व्याख्या स्पष्ट केली आहे. अन्न पदार्थाचा व्यवसाय करणारे स्टॉलधारक व फिरते विक्रेते जरी पाणीपुरी, भेलपुरी, पावभाजी विक्रेते, आईसक्रीम, बर्फ गोळा, ज्यूस, शरबत विक्रेते, भाजीपाला व फळ विक्रेते, किरकोळ किराणा, डेली नीड्स, बेकरी, घाऊक विक्री करणारे वितरक व वाहतूकदार, गृहउद्योग ते अन्न पदार्थाचे उत्पादक, तसेच उपहारगृह, हॉटेल, खानावळ, चहा विक्रेते, दूध विक्रेते त्याचबरोबर स्वस्तधान्य दुकानदार, कॅटरर्स, शालेय पोषण आहार पुरवठादार, बचत गट, शासकीय, अशासकीय कार्यालयातील कॅंटीन, वसतिगृहातील खानावळ, धार्मिक ठिकाणी वितरित होणारा प्रसाद, मेळावे व प्रदर्शनामधील अन्न पदार्थाचे स्टॉलधारक इत्यादी सर्व अन्न व्यावसायिक या वर्गवारीच्या कक्षेत येतात. हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रोजी 584 परवाना व 3 हजसा 445 नोंदणी प्रमाणपत्र असे एकूण 4 हजार 29 सक्रीय परवाना व नोंदणी धारक अन्न व्यावसायिक आहेत. काही अन्न व्यावसायिकांनी मुदतीपूर्व परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याने अनेक परवाना धारक सक्रीय नसल्याचेही आढळून आलेले आहेत. परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी त्वरित ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. परवाना व प्रमाणपत्राची मुदत संपली असल्यास नूतनीकरण करण्यात यावे. सक्रीय परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्र न घेता व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व अन्न व्यावसायिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, हिंगोली यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment