03 March, 2025

लोकसंगीत महोत्सव - हिंगोली येथे बुधवारपासून तीन दिवसीय लोकसंगीत महोत्सवाचे आयोजन*

• सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय,महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजन हिंगोली, दि. ०३(जिमाका): राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृती व परंपरेची ओळख नव माध्यमातून व्हावी या उद्देशाने सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, यांच्या वतीने हिंगोली येथे ५ ते ७ मार्चदरम्यान लोकसंगीत महोत्सव २०२५चे शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यातील विविध गायक कलाकार व कलापथक त्यांची कला सादर करणार आहेत. बुधवार, दि ५ मार्च २०२५ रोजी संज्योती जगदाळे, कुणाल वराळे व मीरा उमप यांच्यासह सहकलाकार आपली कला सादर करणार आहेत, तर गुरुवार दिनांक ६ मार्च २०२५ रोजी मयूर सुकाळे, श्रावणी महाजन, चंद्रकांत शिंदे, रवींद्र खोमणे यांच्यासह सहकलाकार हे आपली कला सादर करतील. या महोत्सवाचा समारोप शुक्रवार दिनांक ७ मार्च २०२५ रोजी होणार असून, हिंगोलीचे स्थानिक कलाकार दिनकर लोणकर व संच तसेच लक्ष्मी लहाने व विष्णू शिंदे यांच्यासह सहकलाकार कला सादर करणार आहेत. हा लोकसंगीत महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून या महोत्सवात सहभागी कलाकार कलापथक, संगीत नृत्याचा मिलाफ असणाऱ्या कार्यक्रमाचा कला रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे. *****

No comments:

Post a Comment