24 April, 2025
भूसंपादन प्रक्रियेतील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी लागणाऱ्या जमिनीसाठीची भूसंपादन प्रक्रियेतील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले.
आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली भूसंपादन, सार्वजनिक बांधकाम, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामान्य प्रशासन विभाग वन हक्क आदी विभागाचा आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, कळमनुरीच्या उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भूते, वसमतचे नायब तहसीलदार दामोदर जाधव, उप प्रादेशिक परिहवन अधिकारी राहुल गावडे, सहायक मोटार वाहन निरीक्षक अतुल बानापुरे, उप अभियंता सुदेश देशमुख आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात विविध विकास प्रकल्प, त्यासाठी लागणारी जमीन, सुरु असलेले विविध कामे, मावेजाचे वाटप, भूसंपादित जमिनीची मोजणी आदी कामे तातडीने मार्गी लावावेत. नागपूर ते पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग मोजणीच्या कामासाठी शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. त्या शेतकऱ्यांची समजूत काढून शक्तीपीठ महामार्ग मोजणी तात्काळ सुरु करावी. तसेच त्यांना मावेजा त्वरित मिळवून देण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
अपघाताची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करा-जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील अपघाताची संख्या कमी करण्यासंदर्भात उपाययोजना करावेत, जिल्ह्यातील बासंबा टी पॉईंट व लिंबाळा मक्ता या अपघात प्रवण क्षेत्रात पॅराबोलिक मीरर लावण्या संदर्भात सूचित केले. तसेच अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई चालू ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बैठकीत दिले.
यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल गावडे यांनी अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर आतापर्यंत केलेली कार्यवाही, अपघात प्रवण क्षेत्र व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनाची माहिती आढावा बैठकीत दिली.
वनहक्क धारकांना शासनाचा लाभ देण्याची कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी
अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी वन हक्क धारकांचे सामुहिक व वैयक्तीक वनहक्काचे जुने व नवीन नोंद झालेली दावे, वनहक्क धारकांना सातबारा वाटप, मोजणी झालेली प्रकरणे तसेच मोजणीसाठी प्रलंबित प्रकरणे, फेर चौकशीसाठी पाठविलेली प्रकरणे, अपील प्रकरणे शासन निर्णयातील तरतुदीनुसार तात्काळ निकाली काढून पात्र वनहक्क धारकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचाही आढावा घेतला.
*****
No comments:
Post a Comment