16 May, 2025

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये

हिंगोली (जिमाका), दि. 16 : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 परीक्षा ऑनलाईन पध्दतीने आयोजित केली आहे. त्याची ऑनलाईन आवेदनपत्र दि. 14 मेपर्यंत सादर करण्याचे कळविले होते. त्याबाबत समाजमाध्यमांवर फिरणारा संदेश वा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा-2025 पुढे ढकलण्याबाबत व इतर अडचणीबाबत युट्यूब चॅनल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे व अन्य माध्यमाद्वारे अनाधिकृत बाबी प्रसिध्द होत आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन परीक्षा परिषदेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे मे व जून, 2025 मध्ये आयोजन करण्यात येत असल्याचे दि. 21 मार्च, 2025 रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले होते. त्यानुसार पात्र उमेदवारांनी या परीक्षेबाबत आवश्यक ती पूर्व तयार करावी, असे आवाहन करण्यात आले होते. या परीक्षा नियोजित केल्याप्रमाणे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे परीक्षार्थ्यांनी युट्यूब चॅनल्स, सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे दिल्या जाणाऱ्या बातम्या, अफवावर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. या व्यतिरिक्त अन्य माध्यमातून प्रसिध्द होणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे विद्यार्थ्यांचे, उमेदवारांचे नुकसान झाल्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे कार्यालय जबाबदार असणार नाही. विद्यार्थ्यांनी, उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार कार्यवाही करावी, असे आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

No comments:

Post a Comment