23 December, 2025

शासनाच्या विविध योजनेचा लाभ देण्यासाठी ऊसतोड कामगारांचा सर्वे करावा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 23 : शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना मिळावा यासाठी सर्व ऊसतोड कामगारांचा सर्वेक्षणाद्वारे सविस्तर व अद्ययावत डाटा संकलीत करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, जिल्हा ऊसतोड कामगार समिती तसेच प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व समिती सदस्य उपस्थित होते. ऊसतोड कामगारांची अचूक ओळख पटविण्यासाठी सुस्पष्ट सर्वेक्षण प्रश्नावली तयार करावी. आशा सेविकांमार्फत गावपातळीवर प्रत्यक्ष भेटी घेऊन सर्वेक्षण करण्यात यावे. यासाठी ऊसतोड कामगारांसाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे. सर्व ऊसतोड कामगारांचा अद्ययावत डाटा तयार करून त्यांना ई-श्रम कार्ड तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. बैठकीत साखर कारखान्यांमार्फत ऊसतोड कामगारांची माहिती व नोंदणी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या सानुग्रह अनुदान योजना, महिला ऊसतोड कामगारांच्या आरोग्य समस्या, गर्भवती महिला ऊसतोड कामगारांसाठी उपलब्ध सुविधा तसेच माता व बालकांच्या आरोग्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी पात्र प्रस्तावांना मान्यता जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील अत्याचार पीडितांना अर्थसहाय्य देण्यासाठी प्राप्त प्रथम खबर अहवाल व दोषारोपपत्रावरील प्रस्तावांवर चर्चा करून पात्र प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. ज्या प्रकरणांमध्ये त्रुटी आहेत, त्या त्रुटींची पूर्तता करून पुढील बैठकीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. या बैठकीस जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. आर. दरपलवार, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, पोलीस विभागाचे अधिकारी तसेच सर्व संबंधित समिती सदस्य उपस्थित होते. ***

No comments:

Post a Comment