23 December, 2025

राष्ट्रीय शेतकरी दिवस व ‘जी राम जी’ अधिनियमाबाबत तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात जनजागृती कार्यक्रम संपन्न

हिंगोली (जिमाका), दि.23 : भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), तोंडापूर येथे राष्ट्रीय शेतकरी दिवस तसेच ‘विकसित भारत-रोजगार आणि आजीविकेसाठी हमी मिशन (ग्रामीण) 2025’ (VB-GRAM G) अर्थात ‘जी राम जी’ अधिनियमाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय कृषी राज्यमंत्री भागीरथ चौधरी आणि सचिव डॉ. दिवेश चतुर्वेदी यांनी वेबकास्टिंगद्वारे देशभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर येथे उपस्थित शेतकरी व नागरिकांसाठी करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारताचे पाचवे पंतप्रधान व शेतकरी नेते चौधरी चरण सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. केव्हीकेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी ‘विकसित भारत 2047’ या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर समृद्ध ग्रामीण भारतासाठी ‘जी राम जी’ अधिनियमाचे महत्त्व विशद केले. या अधिनियमान्वये ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांची रोजगार हमी, शेतीच्या पीक हंगामात मजुरांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 60 दिवसांची विशेष तरतूद तसेच पारदर्शक अंमलबजावणीची प्रक्रिया याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये बबन ढोबळे, प्रभाकर मगर, महादेव अकमर यांच्यासह इतर 14 शेतकऱ्यांचा समावेश होता. कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना ‘जी राम जी’ अधिनियमांतर्गत बेरोजगारी भत्ता, केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के निधी हिस्सा, तसेच मजुरी दरांबाबत सविस्तर तांत्रिक माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विषय विशेषज्ञ राजेश भालेराव, अनिल ओळंबे, अजय कुमार सुगावे, डॉ. अतुल मो. मुराई, श्री. साईनाथ खरात, डॉ. कैलास गीते तसेच कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. कैलास गीते यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अतुल मुराई यांनी केले. या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी, बचत गट प्रतिनिधी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments:

Post a Comment