23 December, 2025

भव्य कर्णबधीर तपासणी, श्रवणयंत्र वाटप व उपचार शिबीर संपन्न

हिंगोली (जिमाका), दि.23 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून 0 ते 18 वर्ष वयोगटातील कर्णबधीर आजाराने ग्रस्त विद्यार्थ्यांसाठी भव्य तपासणी, श्रवणयंत्र वाटप व उपचार शिबीराचे आयोजन आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले होते. या शिबीराचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या शिबीरात जिल्ह्यातील एकूण 125 कर्णबधीर आजाराच्या संदर्भित विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. कर्णबधीर तपासणीसाठी कर्ण हॉस्पिटल, कोल्हापूर येथील तज्ज्ञ डॉ. संदेश बागडी (एम.एस. ईएनटी सर्जन), डॉ. मोहन कुलकर्णी तसेच श्री. काळे (ऑडिओमेट्रिशियन) यांच्या चमूने विद्यार्थ्यांची सखोल तपासणी केली. शिबीरात उपस्थित विशेषतज्ज्ञांचे स्वागत अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, बालरोग तज्ज्ञ वर्ग-१ डॉ. गोपाल कदम, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन बोधगिरे, भूलतज्ज्ञ डॉ. नितीन पुरोहित आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या शिबीरात जिल्ह्यातील 75 कर्णबधीर विद्यार्थ्यांची बहिरेपणाची तपासणी करून 90 श्रवणयंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच गंभीर कर्णबधिरतेच्या उपचारासाठी व कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी काही विद्यार्थ्यांना कर्ण हॉस्पिटल, कोल्हापूर येथे संदर्भित करण्यात आले. या शस्त्रक्रियांमध्ये लहान मुलांच्या कर्णबधिरतेवरील अत्याधुनिक उपचारांचा समावेश आहे. शिबिरात सर्व तपासणी व औषधोपचार पूर्णतः मोफत करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. नांदूरकर, डीईआयसी मॅनेजर, लक्ष्मण गाभणे (जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक), ज्ञानोबा चव्हाण (सांख्यिकी अन्वेषक), प्रशांत गिरी (एफएलसी) तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातील सर्व वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता, ए.एन.एम. व रुग्णालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कर्णबधीर शिबिराच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील गरजू विद्यार्थी व बालकांनी श्रवणयंत्र, उपचार व शस्त्रक्रियेसाठी तालुकानिहाय आरबीएसके वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या बालकासाठी संपूर्ण मोफत कर्णबधिर उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. ***

No comments:

Post a Comment