06 August, 2026

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय इमारतींचे रेट्रोफिटिंग करण्यावर भर , सीबीआरआयच्या तज्ज्ञांकडून अधिकारी, अभियंत्यांना कार्यशाळेत मार्गदर्शन

 


हिंगोली (जिमाका), दि. 6 : जिल्ह्यात वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने केंद्रीय इमारत संशोधन संस्था, रुडकी, उत्तराखंड आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी व अभियंत्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, केंद्रीय इमारत संशोधन संस्थेचे मुख्य वरिष्ठ वैज्ञानिक अजय चौरसीया तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश जोशी, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यात भूकंपाच्या घटना घडत असल्याने भविष्यात होणारी संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. जुन्या इमारतींचे बळकटीकरण, भूकंपरोधक इमारतींची उभारणी तसेच रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून विद्यमान इमारती अधिक सुरक्षित करण्याबाबत या कार्यशाळेत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

भूकंपग्रस्त गावांचा केंद्रीय इमारत संशोधन संस्थेमार्फत सर्वेक्षण करून आवश्यकतेनुसार शासकीय इमारतींचे रेट्रोफिटिंग करण्यात येणार आहे. या कामाचे प्रात्यक्षिक वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीचे रेट्रोफिटिंग करून दाखविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.

नागरिकांनीही भूकंपरोधक बांधकामाचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. रेट्रोफिटिंगच्या माध्यमातून विद्यमान घरांची सुरक्षितता वाढविता येते. या तंत्रज्ञानामुळे भूकंपाच्या वेळी जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार माफक खर्चात आपल्या घरांचे रेट्रोफिटिंग करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

कार्यशाळेत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी कमी खर्चात घर अधिक सुरक्षित कसे करता येईल, याबाबत व्हिडिओ व सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली. भूकंपरोधक इमारतींची उभारणी, विद्यमान इमारतींचे रेट्रोफिटिंग, त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान, बांधकाम साहित्याचे योग्य प्रमाण आणि वापरण्याची पद्धत याबाबत सीबीआरआयचे तज्ज्ञ वरिष्ठ वैज्ञानिक अजय चौरसिया यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

भूकंपप्रवण भागातील इमारतींची सुरक्षितता वाढविण्यासाठी अभियांत्रिकीच्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करणे, जुन्या इमारतींची तपासणी करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांचे संरचनात्मक बळकटीकरण करणे या बाबींवरही कार्यशाळेत विशेष भर देण्यात आला.

कार्यशाळेस जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, अभियंते तसेच संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******* 







No comments:

Post a Comment