15 August, 2026

वीरमाता, वीरपत्नींच्या त्यागाला सलाम; त्यांच्या कुटुंबीयांच्या शासन सदैव पाठीशी– पालकमंत्री नरहरी झिरवाळ



* शिरडशहापूर येथे वीर योद्धा परिवार सन्मान सोहळा उत्साहात








हिंगोली(जिमाका), दि. १५  : देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या वीरमाता आणि वीरपत्नींचे योगदान अतुलनीय आहे. आपल्या पतीचे किंवा मुलाचे दुःख मनात ठेवूनही त्यांनी देशासाठी आणि समाजासाठी मोठा त्याग केला आहे. त्यांच्या या त्यागाला आणि योगदानाला सलाम असून, शासन व समाज म्हणून सर्वजण वीरमाता, वीरपत्नी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या सदैव पाठीशी आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.

औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथील श्री शांती विद्या मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ‘वीर योद्धा परिवार सन्मान सोहळ्या’त पालकमंत्री नरहरी झिरवाळ बोलत होते.

यावेळी मुनिश्री १०८ अक्षयसागर महाराज, मुनिश्री १०८ उपशमयसागर महाराज, आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मिलिंद यंबल आदी उपस्थित होते.

देशरक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हिंगोली, परभणी, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वीर जवानांच्या वीरमाता व वीरपत्नींचा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागातून देशसेवेची प्रेरणा मिळते. अशा कुटुंबीयांच्या सन्मानाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करत पालकमंत्री झिरवाळ यांनी वीरमाता व वीरपत्नींना सलाम केला. तसेच श्री शांती विद्या मंदिराच्या मंदिरासाठी आवश्यक असलेल्या सोलर व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी समयोचित भाषणातून वीर जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद यंबल यांनी केले.

यावेळी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. वीर जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

******

No comments:

Post a Comment