13 November, 2025

हिंगोलीमध्ये 18 नोव्हेंबर रोजी ‘सरदार@150 युनिटी पदयात्रा’

• एकतेचा जयघोष ,राष्ट्रीय अभिमान, एकता आणि स्वावलंबनाचा संदेश • नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे हिंगोली, (जिमाका) दि.13: युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार आणि माय भारत हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार@150 युनिटी मार्च आणि विकसित भारत पदयात्रा उपक्रमाचे आयोजन मंगळवार, (दि.18) रोजी सकाळी 8 वाजता हिंगोली येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, राष्ट्रीय सेवा योजना राज्य संचालक, जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, जिल्हा क्रीडा अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. पवन बन्सोड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पदयात्रेद्वारे तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण राष्ट्राच्या ऐक्य, अखंडता आणि देशभक्तीच्या भावनांना पुनरुज्जीवित करतील. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकसंध भारताच्या विचारांना स्मरून एकात्म भारताच्या निर्मितीचा संकल्प या माध्यमातून घेतला जाणार आहे. तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान, सामाजिक जबाबदारी आणि एकतेची भावना निर्माण करणे असा या उपक्रमाचा उद्देश असून, सर्व नागरिकांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन माय भारत केंद्राचे अधिकारी अनिल ढेंगे यांनी केले आहे. देशव्यापी मोहिमेची पार्श्वभूमी 6 ऑक्टोबर 2025 रोजी भारत सरकारने माय भारत पोर्टल वरून सरदार@150 युनिटी मार्च या डिजिटल मोहिमेची सुरुवात केली. या उपक्रमात सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा आणि सरदार@150 यंग लीडर्स कार्यक्रमाचा समावेश आहे. या कार्यक्रमातील 150 विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे. मोहिमेचे दोन टप्पे असून, प्रत्येक जिल्ह्यात 8 ते 10 कि.मी. लांबीची पदयात्रा काढली जाईल. शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वादविवाद, परिसंवाद, पथनाट्य आदी उपक्रम,ड्रग्जमुक्त भारत व अभिमानाने स्वदेशी अशा प्रतिज्ञा अभियानासह योग, आरोग्य व स्वच्छता मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. पदयात्रेदरम्यान सरदार पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरण केले जाईल. पदयात्रेचे नेतृत्व एनसीसी अधिकारी करतील. राष्ट्रीय पदयात्रा (26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025) करमसद (पटेल यांचे जन्मस्थान) ते केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असा 152 कि.मी. प्रवास होईल. मार्गावरील गावांमध्ये सामाजिक विकास उपक्रम, डेव्हलपिंग इंडिया प्रदर्शन आणि सरदार गाथा सादर केली जाईल. सर्व नोंदणी माझे भारत पोर्टल https://mybharat.gov.in/pages/unity_march यावर सुरू आहे. तरुणांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून एक भारत, श्रेष्ठ भारत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ******

No comments:

Post a Comment