11 November, 2025

दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे लाभ घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 11 : शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे बदली, सरळसेवा नियुक्ती, पदोन्नती, अतिरिक्त प्रवास भत्ता आदी विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला आहे. तथापि, अशा प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून काही प्रकरणांमध्ये दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्राबाबत (युडीआयडी कार्ड) शंका व्यक्त केली गेली आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवांनी दिलेल्या निर्देशानुसार अशा सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. आज जिल्हाधिकारी गुप्ता यांनी गुगल मीटद्वारे दिव्यांग कल्याण विभागाच्या योजनांचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी गीता गुठ्ठे, सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थी दिव्यांग व्यक्तींचे युडीआयडी कार्ड व आधारकार्ड परस्पर लिंक केले जावे. पुढे कोणत्याही योजनेचा लाभ देताना यूडीआयडी आणि आधार लिंक करूनच लाभ द्यावा. तसेच जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तरीय शासकीय कार्यालयांच्या इमारती तसेच सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना सर्व प्रकारच्या आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. या अनुषंगाने सर्व शासकीय इमारती सुगम्य करण्यासाठी स्वतंत्र रॅम्प, रेलिंग, ब्रेल टाईल्स, साईनबोर्ड, व्हीलचेअर, तसेच दिव्यांगांसाठी सुलभ शौचालयांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कामे तातडीने पूर्ण करावीत. दिव्यांग व्यक्ती कार्यालयात आल्यास त्यांना प्रतीक्षारांगेत न ठेवता प्राधान्याने सेवा द्यावी, त्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. तसेच प्रत्येक कार्यालयात “दिव्यांग मित्र” व अंध व्यक्तींसाठी “दिव्यांग सहाय्यक” नियुक्त करावा. दिव्यांगांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट निर्देश दिले. *****

No comments:

Post a Comment