11 November, 2025
शिक्षक पात्रता परीक्षेच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय आयोजन व नियंत्रण समितीची बैठक संपन्न
• सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 11 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-2025) संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या जिल्हास्तरीय आयोजन व नियंत्रण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
या बैठकीस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भानुदास पुटवाड, शिक्षणाधिकारी (प्रा./मा.) श्रीमती आसावरी काळे तसेच समितीतील इतर सदस्य व प्रतिनिधी उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यात महा- टीईटी 2025 ही परीक्षा एकूण 20 परीक्षा केंद्रांवर दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे. सकाळच्या सत्रात (पेपर-I) साठी 2442 विद्यार्थी सहभागी होतील. परीक्षा वेळ सकाळी 10.30 ते दुपारी 1 पर्यंत राहील. दुपारच्या सत्रात (पेपर-II) साठी 2886 विद्यार्थी सहभागी होतील. परीक्षा वेळ दुपारी 2.30 ते सायंकाळी 5 पर्यंत राहील.
विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रात प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच उमेदवारांनी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य आहे.
प्रत्येक पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र आवश्यक असून दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र बैठक क्रमांक असणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी या सूचनेची गांभीर्याने नोंद घ्यावी. परीक्षेपूर्वी उमेदवारांनी आपले परीक्षा केंद्र निश्चित करून घ्यावे. परीक्षा सुरू होण्याच्या किमान 20 मिनिटे आधी परीक्षागृहात प्रवेश दिला जाईल; त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात मोबाईल फोन, स्मार्टवॉच किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. प्रवेशपत्राच्या मागील बाजूस दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी गुप्ता यांनी परीक्षेच्या सुरळीत पार पडण्यासाठी 9 भरारी पथके नियुक्त करण्याचे निर्देश दिले. तसेच शिक्षणाधिकारी (योजना) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या नेतृत्वाखाली 2 स्वतंत्र नियंत्रण पथके कार्यरत राहतील.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्या दि. 18 ऑक्टोबर, 2025 च्या पत्रानुसार परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रात व दालनात सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच प्रवेशद्वारावर फिंगरप्रिंट, फेस स्कॅनिंग व फ्रिस्किंग सुविधा उपलब्ध असणार आहेत. परीक्षेदरम्यान केंद्राबाहेर 100 मीटरच्या परिसरात झेरॉक्स मशीन चालू ठेवण्यास सक्त मनाई असेल. सर्व सूचना काटेकोरपणे अंमलात आणाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी दिले.
*****

No comments:
Post a Comment