10 November, 2025
पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा लागू • लघु व मध्यम पशुपालकांना मिळणार सवलतींचा लाभ
हिंगोली(जिमाका) दि. १० : पशुपालन व्यवसायाला आता कृषी व्यवसायाचा समकक्ष दर्जा देण्यात आला असून, या निर्णयामुळे लघु व मध्यम स्वरुपाच्या पशुपालकांना कृषीच्या धर्तीवर विविध सवलतींचा लाभ मिळणार आहे. या संदर्भात माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांनी दिली आहे.
पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता. परिणामी, शासनाने पशुपालनाला कृषी व्यवसायाचा दर्जा मंजूर केला आहे. या निर्णयानुसार पशुपालकांना कृषीप्रमाणे वीज सवलत, ग्रामपंचायत करामधील सवलत तसेच कृषी कर्जावरील व्याज सवलत मिळणार आहे. त्यामुळे पशुपालकांच्या उत्पादन खर्चात घट होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.
या अटींचे पालन आवश्यक
वीज सवलत मिळविण्यासाठी पशुपालकांनी जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन) कार्यालयात नोंदणी करणे बंधनकारक आहे. सर्व पशुधनाची नोंदणी भारत पशुधन पोर्टल वर करणे आवश्यक आहे. वीज वितरण कंपनीमार्फत स्वतंत्र मीटर बसविणे बंधनकारक आहे.
खालील पशुपालन युनिट्सना मिळणार सवलत
25 हजार किंवा त्यापेक्षा कमी मांसल कुक्कुट पक्षी, 50 हजार किंवा त्यापेक्षा कमी अंडी उत्पादन पक्षी, 45 हजार किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेची हॅचरी युनिट, 100 किंवा त्यापेक्षा कमी दुधाळ जनावरांचा गोठा, 500 किंवा त्यापेक्षा कमी शेळ्या/मेंढ्या असलेला गोठा, 200 किंवा त्यापेक्षा कमी वराहपालन युनिट, पशुपालन प्रकल्पातील पशुगृह, चारा साठवण, पशुखाद्य निर्मिती, पंपिंग यंत्रणा, प्रक्रिया केंद्रे व शितगृहे (कोल्ड स्टोरेज) या सर्व सुविधांसाठी सवलतीच्या दरात वीज वापर करण्याची परवानगी दिली जाईल.
पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी दर्जा लागू झाल्याने ग्रामीण भागातील पशुपालकांना आर्थिक दिलासा मिळणार असून, पशुधन विकासास नवी दिशा मिळेल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे.
******
No comments:
Post a Comment