28 November, 2025

आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त कळमनुरी तालुक्यात विविध ठिकाणी जनजागृती

हिंगोली(जिमाका), दि.28: आंतरराष्ट्रीय दत्तक महिना निमित्त हिंगोली जिल्ह्यात “विशेष गरजा असलेल्या मुलांचे (दिव्यांग मुले) संस्थाबाह्य पुनर्वसन” या विषयावर जनजागृती उपक्रमांना सुरूवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन जिल्हा प्रशासनाने या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला आहे. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.आर. दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार कळमनुरी तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी पोलीस स्टेशन, बसस्थानक, खाजगी रुग्णालये, प्रसूतीगृहे अशा विविध सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स, बॅनर व माहितीपत्रकांच्या माध्यमातून कायदेविषयक जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे व बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीबखान पठाण यांनी कोणतेही बालक परस्पर दत्तक देणे किंवा घेणे हा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. दत्तक घेण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया www.missionvatsalya.wcd.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करूनच पूर्ण करावी, असे त्यांनी सांगितले. कायदा तसेच परिविक्षा अधिकारी अॅड. अनुराधा पंडित यांनी जिल्ह्यातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत असलेल्या उमंग शिशुगृह (विशेष दत्तक संस्था), सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह व बालगृह (हिंगोली), तसेच श्री स्वामी समर्थ बालगृह, खानापूर (चित्ता) याबाबत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे यांनी बाल संगोपन योजना व प्रतिपालकत्व योजनेची माहिती तर केस वर्कर राजरत्न पाईकराव यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या आपत्कालीन सेवेविषयी मार्गदर्शन केले. या जनजागृती कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.डी. माहुरे, डॉ. अनिती जामगडे, डॉ. शिवप्रसाद शेट्टे, कळमनुरी पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, पोलीस उपनिरीक्षक संतोष इंगळे, डॉ. लक्ष्मण कदम, डॉ. स्मिता कदम तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ***

No comments:

Post a Comment