16 December, 2025

जल जीवन मिशन अंतर्गत कामे तातडीने पूर्ण करावीत – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली (जिमाका), दि. 16 : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जलजीवन मिशन तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सचिव तथा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, सर्व उपविभागांतील संबंधित उपअभियंते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागाचे उपअभियंते, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेड या त्रयस्थ तांत्रिक तपासणी संस्थेचे प्रतिनिधी तसेच वॅपकॉस (WAPCOS) लिमिटेड या अंमलबजावणी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडील शालेय शौचालय बांधकामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुलकर्णी यांनी कामांची सद्यस्थिती मांडली. उर्वरित शालेय शौचालयांची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. यानंतर पाणी पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनांची माहिती सादर करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील 211 नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित योजनांच्या प्रगतीच्या विविध टप्प्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. माहे सप्टेंबर 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत उपविभागनिहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टांनुसार पूर्ण करावयाच्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सखोल आढावा घेतला. डिसेंबर 2025 अखेरपर्यंत देण्यात आलेल्या उद्दिष्टांनुसार सर्व प्रलंबित कामे पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गुप्ता यांनी दिले. तसेच ज्या कामांची उद्दिष्टपूर्ती झाली नाही, त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनांतील सर्व उपांगांच्या कामांची जिओ-टॅगिंग करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले. *****

No comments:

Post a Comment