26 December, 2025

पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हिंगोली जिल्ह्यात लिंगगुणोत्तरात वाढ

* जिल्हा सल्लागार समितीची बैठक संपन्न * गर्भलिंग निदान व अनधिकृत गर्भपाताबाबत संकेतस्थळावर व हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी हिंगोली (जिमाका), दि. २६ : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवड प्रतिबंध) अधिनियम (पीसीपीएनडीटी) अंतर्गत जिल्हा सल्लागार समिती, हिंगोलीची बैठक नुकतीच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील लिंगगुणोत्तर बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सन २०२३ मध्ये लिंगगुणोत्तर प्रमाण १०००:८९७ इतके होते, ते सन २०२४ मध्ये १०००:९६१ इतके झाल्याने ६४ ने वाढ झाल्याचे निदर्शनास आले. ही बाब समाधानकारक असून पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ही वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले. पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची त्रैमासिक तसेच अचानक तपासणी करणे, स्टिंग ऑपरेशन व डी-कॉय केसेस राबविणे याबाबत सर्व समुचित प्राधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच अनधिकृत गर्भपात रोखण्यासाठी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. गर्भलिंग निदान होऊ नये यासाठी सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती करणे, बक्षीस योजनांबाबत माहिती देणे तसेच तक्रार नोंदविण्यासाठी वेबसाईट व हेल्पलाईन क्रमांकाची प्रसिद्धी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी जिल्ह्यात विविध कारवाया करण्यात आलेल्या असून सध्या न्यायालयात ०३ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती देण्यात आली. समुचित प्राधिकाऱ्यांमार्फत त्रैमासिक व धडक मोहिमांद्वारे तपासण्या केल्या जात असून सार्वजनिक ठिकाणी जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. मुलींचे समाजातील महत्त्व पटवून देण्यासाठी समुपदेशन करण्यात येते. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे स्त्री जन्माचे स्वागत प्रसूती मातेस साडी-चोळी देऊन करण्यात येते, अशी माहिती अॅड. सुकेशिनी ढवळे यांनी समितीसमोर सादर केली. पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊन हिंगोली जिल्ह्याचे लिंगगुणोत्तर अधिक सुधारण्यासाठी नागरिकांनी गर्भलिंग निदान व अनधिकृत गर्भपाताबाबत www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर तसेच १८००२३३४४७५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी केले आहे. *******

No comments:

Post a Comment