24 January, 2026

*‘हिंद दी चादर’ अंतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्यांचा*
 *मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते सन्मान*
हिंगोली, दि. 23 (जिमाका): श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीद समागम कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘हिंद दी चादर’ अंतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांचा आज शुक्रवार, (दि23) रोजी जिल्हा परिषद कार्यालयातील नक्षत्र सभागृह येथे समारंभात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण अधिकारी संदीपकुमार सोनटक्के आणि आसावरी काळे तसेच गटशिक्षणाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यात श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350 व्या शहीद समागम दिनानिमित्त तालुकानिहाय विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगदान दिल्याबद्दल मुख्याध्यापकांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वक्तृत्व व गायन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचे सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे संपूर्ण नक्षत्र सभागृह राष्ट्रभक्ती व सांस्कृतिक भावनेने भारावून गेले.
 यावेळी गायन स्पर्धेत पार्थ इंगोल हा प्रथम, संख्या सुधाकर धुळे द्वितीय, रुपाली पोटेने तृतीय क्रमांक मिळविला. वक्तृत्व स्पर्धेत अक्षरा देशमुख प्रथम प्राजक्ता शेळके व किरण मांदळे द्वितीय तर पूर्वी जाधव तृतीय, निबंध स्पर्धेत जान्हवी घेणेकर, अर्चना पाईकराव ‍द्वितीय, प्रिया मुळे व वेदिका काकडेने तृतीय क्रमांक मिळविला आणि चित्रकला स्पर्धेत समृद्धी घुगे प्रथम, तृप्ती पतंगे द्वितीय तर शालिनी पवार आणि देवराव गिऱ्हे हे तृतीय आले असून, त्यांचा यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. 
 याच कार्यक्रमात जिल्ह्यात पहिल्या पाच क्रमांकाने पीएम श्री जिल्हा परिषद प्रशाला आखाडा बाळापूर कळमनुरी प्रथम, पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा सातेफळ, वसमत द्वितीय, जिल्हा परिषद कन्या प्रशाला हिंगोली तृतीय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येडूद औंढा नागनाथ, चौथी आणि पाचव्या क्रमांकावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, म्हाळशी तालुका सेनगाव यांचा क्रमांक लागला. 
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी संदीप कुमार सोनटक्के यांनी केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, संस्कार व सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करणारा ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
 ******

No comments:

Post a Comment