विशेष वृत्त
अहिल्यानगर येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' शीख इतिहासातील 'झफरनामा' या महत्त्वपूर्ण अध्यायाचा साक्षीदार !
अहिल्यानगर, दि. २१ - नांदेड येथे 'हिंद की चादर' श्री गुरू तेग बहादूर यांच्या ३५० व्या पावन स्मृती पर्वाच्या ऐतिहासिक सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशात मोलाची भर घालणाऱ्या अहिल्यानगर शहराला लाभलेल्या शीख इतिहासाच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण पर्वावर प्रकाश टाकणे क्रमप्राप्त ठरते. गोविंदपुरा येथील 'गुरुद्वारा भाई दया सिंगजी' हे स्थान शीख इतिहासातील 'झफरनामा' या निर्णायक घटनेचा थेट साक्षीदार मानले जाते.
इतिहासाच्या पानांवर कोरलेली ही महत्त्वपूर्ण घटना १८ व्या शतकाच्या सुरुवातीची (सन १७०५-०६) आहे. शीख धर्माचे दहावे गुरु, श्री गुरु गोविंदसिंगजी महाराज यांनी स्वतःच्या वडिलांचे व पुत्रांचे मारेकरी ठरलेल्या तत्कालीन मुघल बादशहा औरंगजेब याला एक अत्यंत महत्त्वपूर्ण पत्र पाठविले होते, जे इतिहासात 'झफरनामा' (विजयाचे पत्र) म्हणून ओळखले जाते. हे ऐतिहासिक पत्र औरंगजेबापर्यंत पोहोचविण्याची अत्यंत महत्त्वाची व जोखमीची जबाबदारी गुरु गोविंदसिंगजींनी 'पंच प्याऱ्यां' पैकी एक असलेल्या 'भाई दया सिंगजी' यांच्यावर सोपविली होती.
या ऐतिहासिक घटनेचे धागेदोरे थेट अहिल्यानगर शहराशी जोडलेले आहेत. श्री गुरु गोविंदसिंगजी महाराजांनी बादशहा औरंगजेबापर्यंत झफरनामा पोहोचविण्यासाठी भाई दया सिंगजी यांना पाठविले. भाई दया सिंगजी प्रथम औरंगाबाद येथे आले. तेथे त्यांना समजले की औरंगजेब हा अहमदनगरजवळील आलमगीर येथे आहे. त्यानुसार भाई दया सिंगजी अहमदनगर येथे आले; मात्र त्या वेळी त्यांना औरंगजेबाची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे त्यांनी संभाजीनगर (औरंगाबाद) येथील धवणी महल्ला येथे मुक्काम करून प्रयत्न सुरू ठेवले.
सुमारे तीन ते चार महिने सातत्याने प्रयत्न केल्यानंतर अखेर भाई दया सिंगजींना अहिल्यानगर येथे खुले दरबारात औरंगजेबाची भेट मिळाली व त्यांनी झफरनामा त्याच्यासमोर सादर केला. त्या काळी औरंगजेब अहमदनगरच्या भिंगार भागात छावणीत होता. त्या छावणीच्या बाहेरील मर्यादेत असलेल्या सध्याच्या गोविंदपुरा परिसरात (अहिल्यानगर) भाई दया सिंगजी, औरंगजेबाची भेट मिळावी व झफरनामा सादर करता यावा यासाठी थांबले होते.
याच पवित्र भूमीवर, जी भाई दया सिंगजींच्या चरणांनी पावन झाली आहे, त्या जागेचा विकास अहिल्यानगर येथील शीख समाजाने श्रद्धेने व स्वखर्चाने करून आज ती जागा “गुरुद्वारा भाई दया सिंगजी साहिब, गोविंदपुरा, अहिल्यानगर” म्हणून ओळखली जाते.
गुरु गोविंदसिंगजींनी हे पत्र मूळ पर्शियन (फारसी) भाषेत लिहिले असून त्यात एकूण १११ कडवी (शेर) आहेत.'झफरनामा' म्हणजे केवळ एक पत्र नसून ती अन्यायाविरुद्ध पुकारलेली नैतिक विजयाची ललकारी होती. या पत्रात गुरूजींनी चमकौरचे युद्ध, आपल्या पुत्रांचे बलिदान व औरंगजेबाच्या सैन्याने पवित्र कुराण पाठवुन दिलेले शब्द न पाळता केलेला विश्वासघात, यावर कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. याच पत्रात शीख इतिहासातील प्रसिद्ध ओळ नमूद आहे - कुन् कर अझ हमेह् हील्-ते दार गुज़श्त, हलाल अस्त बुर्दन बा शमशेर दस्त ||२२||
जब अन्याय के खिलाफ सभी प्रयास किये गये हो, न्याय का मार्ग अवरुद्ध हो, तब तलवार उठाना सही है" (जेव्हा अन्यायाचा प्रतिकार करण्याचे शांततेचे सर्व मार्ग बंद होतात, तेव्हा हाती तलवार घेणे हेच उचित व धर्मसंमत ठरते). विशेष म्हणजे, भाई दया सिंगजींनी हे पत्र दिल्यावर खुद्द औरंगजेबाने त्याचा सकारात्मक स्वीकार केला होता व गुरूजींना सन्मानाने भेटीसाठी आमंत्रित करणारे शाही पत्र जारी केले होते, अशी साक्ष येथील इतिहास देतो.
भाई दया सिंगजींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली ही भूमी शीख समाजासाठी अत्यंत पवित्र असून, ती एका ऐतिहासिक पर्वाची साक्ष देत उभी आहे. हे स्थान केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून, भारतीय इतिहासातील एका महत्त्वाच्या कालखंडाचे व गुरु गोविंदसिंगजींच्या सर्वोच्च नीतिमत्तेचे प्रतीक आहे. हा अमूल्य ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणास्त्रोत ठरेल.
***

No comments:
Post a Comment