15 January, 2026

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व गावभेटीतून नागरिकांच्या अडीअडचणींचे निराकरण – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 



हिंगोली, दि. १५ (जिमाका):राज्य शासनाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यात गावभेटींच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या विविध अडीअडचणींचे तात्काळ निराकरण करण्यात येत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज केले.


जिल्हा प्रशासनाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व ई-गव्हर्नन्स संयुक्त दौ-याच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. हिंगोली तालुक्यातील वडद, एकांबा, बोडखी, आंबाळा, आंबाळा तांडा, बोंडाळा, मोप, कनेरगाव, फाळेगाव या गावांना भेटी दिल्या.  


या दौऱ्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी योगेशकुमार मीना, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गड्डापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, आसावरी काळे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता (बांधकाम) श्री. राजपूत, नायब तहसीलदार एस. के. कोकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी विष्णु भोजे, नरेगाचे प्रदीप बोंढारे तसेच सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक व लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवरील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय, महसूल, कृषी, रोजगार हमी योजना (नरेगा) तसेच इतर विभागांशी संबंधित प्रश्नांची प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून त्वरित कार्यवाही करण्यात येत आहे.

गावभेटीदरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, तक्रारी व सूचना ऐकून घेतल्या. अनेक तक्रारींवर संबंधित विभागप्रमुखांना तात्काळ सूचना देऊन ठराविक कालमर्यादेत पूर्तता करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा घेत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात अधिक समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.

या अभियानामुळे ग्रामपंचायतींची प्रशासकीय क्षमता वाढण्यास मदत होत असून लोकसेवा अधिक गतिमान, सुलभ व पारदर्शक होत आहे. नागरिकांनी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा, तसेच ग्रामसभांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळत असून लोकांच्या समस्या थेट गावातच सोडविण्याचा शासनाचा उद्देश यशस्वीपणे साध्य होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा – मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड*

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी केले. 


या अभियानासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून गाव स्वच्छ व सुंदर करणे, गावात प्लास्टिक बंदी राबविणे, कर वसुली शंभर टक्के करणे, घरकुलांची कामे लवकरात लवकर पूर्ण करणे यावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

तसेच विकसित भारत ग्रामीण रोजगार व आजीविका मिशन अंतर्गत नव्याने लागू करण्यात आलेल्या कायद्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, पूर्वीच्या नरेगा कायद्यात बदल करून ६५ टक्के जलसंवर्धन कामे, २५ टक्के गावातील मूलभूत सोयीसुविधा निर्माण, तसेच ऊर्वरित आजीविका कामे, पूरप्रतिबंधात्मक कामे यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी योग्य आराखडा तयार करून कामांची निवड करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.


प्रत्येक गावात लखपती दीदी म्हणून जास्तीत जास्त महिला सक्षम व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गायकवाड यांनी यावेळी केले.


या दौऱ्यादरम्यान हिंगोली तालुक्यातील वरील संबंधित ग्रामीण भागातील कृषि योजना, रस्ते, पाणी पुरवठा योजना, घरकुल आवास योजना, नरेगा कामे, पाणंद रस्ते, पंतप्रधान अदर्श ग्राम योजना, दलित वस्तीचे कामे, स्वच्छ भारत, आदिवासी आश्रम शाळा, समाजकल्याण वसतीगृहे, लघु पाटबंधारे तलाव, रेशनदुकान तपासणी, सामाजिक अर्थसहाय्य योजना, आभाकार्ड, 'उमेद'च्या योजना, पी.एम. सूर्यघर मोफत वीज योजनांबाबतची तपासणी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्तपणे केली.

*****

No comments:

Post a Comment