16 January, 2026

हिंद दी चादर शहीदी समागमानिमित्त नरसी नामदेव येथे सोमवारी वारकरी संमेलन




हिंगोली, दि. 16 (जिमाका) : अल्पसंख्याक विकास विभाग व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य शासनाच्या वतीने ‘हिंद-दी-चादर’ या विशेष उपक्रमांतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नरसी नामदेव येथे सोमवार (दि. 19) रोजी वारकरी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे संमेलन नरसी नामदेव येथील नरसी नामदेव सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे 61 अभंग श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट असून, त्यांची जन्मभूमी नरसी नामदेव (महाराष्ट्र) तर समाधीस्थळ घुमान (गुरुदासपूर, पंजाब) येथे आहे. या ऐतिहासिक नात्यामुळे वारकरी परंपरा व शीख गुरुपरंपरा यांच्यातील स्नेह, एकात्मता व भक्तीभाव अधिक दृढ झाला आहे. या परंपरेचे जतन व वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने वारकरी संप्रदायाच्या सक्रिय सहभागातून हे संमेलन आयोजित करण्यात येत आहे.

या वारकरी संमेलनास समस्त शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहवाल, वाल्मीकी, उदासीन तसेच भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) समाजातील मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, क्षेत्रिय आयोजन समितीचे अध्यक्ष विजयजी सतबीर सिंघ, तख्त श्री हुजूर साहिब नांदेडचे जथ्थेदार ज्ञानी कुलवंत सिंघजी, तसेच संत ज्ञानी हरनाम सिंघजी खालसा (दमदमी टकसाल, गुळी) हे मान्यवर सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन तख्त श्री हजूर साहिब, नांदेड व राज्यस्तरीय समागम समिती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाच्या संमेलनास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. 

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमानिमित्त नरसी नामदेव येथे सोमवारी होणाऱ्या वारकरी संमेलनाला जास्तीत - जास्त सर्वधर्मीय भाविकांनी उपस्थित राहावे तसेच अधिक माहितीसाठी अॅड. संतोष कुटे (98501414050 आणि अंबादास दळवी 992252222920 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 
*****

No comments:

Post a Comment