30 January, 2026

बौद्ध समाजातील संस्थांसाठी पायाभूत सुविधांकरिता अनुदान योजना * २० फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


हिंगोली (जिमाका), दि. 30 : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या व संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा अधिक बौद्ध समाजातील विश्वस्त/सदस्य असलेल्या तसेच बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अल्पसंख्यांक विकास विभागाच्या दि. 7 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाअन्वये सन २०२५-२६ या वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येणार आहे.


या योजनेंतर्गत पात्र संस्थांना 10 लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार असून, दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये विहित केलेली योजनेची कार्यपद्धती, पात्रता, अटी व शर्ती कायम राहतील. तसेच शासन निर्णयात नमूद केलेल्या पायाभूत सोयी-सुविधांसाठीच अनुदान देण्यात येणार आहे.


हे अनुदान प्राप्त करण्यासाठी इच्छुक शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या विहित नमुन्यातील प्रपत्र-१, प्रपत्र-२, प्रपत्र-३ व प्रपत्र-५ मध्ये आवश्यक माहिती संगणकीकृत स्वरूपात भरून, शासन निर्णयात नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून सविस्तर प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे दिनांक २० फेब्रुवारी, २०२६ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावेत.


विहित मुदतीनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत, असे जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी तथा जिल्हा नियोजन अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.


*******

No comments:

Post a Comment