12 April, 2026

सामाजिक समता सप्ताहानिमित्त भव्य रक्तदान शिबीर

 



हिंगोली (जिमाका), दि. १२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर आज हिंगोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज  सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गीता गुठ्ठे यांच्या मार्गदर्शनाखाली सरस्वती महिला सेवाभावी संस्था व सामाजिक न्याय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारार्थी श्रीमती शांताबाई मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम गोरे, समाजसेवा अधीक्षक संदीप सोळंके, गौरव लोथे व रक्तपेढी सहाय्यक स्वप्नील दिपके, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद उबाळे, गृहपाल विजयकुमार सोनटक्के, श्रीमती सुलोचना ढोणे, श्रीमती धनश्री अवचार, कोटक महिंद्रा बँकेचे विभागीय व्यवस्थापक अनिल जाधव तसेच सरस्वती महिला सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्रीमती ताराबाई खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार सोनटक्के यांनी केले तर सूत्रसंचालन शंकर पोघे यांनी केले. यावेळी सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

रक्तदान शिबिरात सुमारे 150 ते 200 रक्तदाते उपस्थित होते, त्यापैकी 21 जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. या उपक्रमात समाज कल्याण विभागाचे कर्मचारी तसेच बार्टीचे समतादूत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

*****

No comments:

Post a Comment