हिंगोली (जिमाका), दि. 12 : हिंगोली व परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी येथे पूर्णा नदीवर जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उभारण्यात आलेल्या केबल स्टेड पुलाची तसेच संबंधित भूसंपादन प्रक्रियेची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी तसेच स्थानिक शेतकरी खातेदारांशी चर्चा केली. पुलाच्या उर्वरित कामांसाठी आवश्यक असलेली भूसंपादन प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधितांना निर्देश दिले. तसेच पुलाला जोडणारा रस्ता विकसित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबतही त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी सविस्तर चर्चा केली.
पुलासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांची भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित आहे, अशा सर्व प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढून भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
तसेच आतापर्यंत भूसंपादन व रस्ते विकासाबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली आहे, याची सविस्तर माहिती घेऊन पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी येलदरी येथील जलविद्युत प्रकल्पालाही भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, तहसीलदार सखाराम मांडवगडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
******



No comments:
Post a Comment