19 June, 2026

सर्व आरोग्य संस्थांनी एनक्यूएएस मानांकनासाठी गुणवत्तावृद्धीवर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


नियामक मंडळाच्या बैठकीत आरोग्य सेवेचा सविस्तर आढावा



हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व इतर आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन (NQAS) प्राप्त करण्यासाठी आवश्यक निर्देशांकांनुसार पायाभूत सुविधा, सेवा गुणवत्ता आणि रुग्णाभिमुख कामकाजात सुधारणा कराव्यात. एनक्यूएएसच्या अनुषंगाने सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करून 31 जुलै 2026 पर्यंत आवश्यक पूर्तता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा तसेच एनक्यूएएस मानांकन प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. राहुल गीते, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिपक मोरे यांच्यासह संबंधित‌ अधिकारी तसेच कार्यक्रम समन्वयक उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्राप्त करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रांनी जबाबदारीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. आरोग्य संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी, दुरुस्ती व सुधारणा जिल्हा वार्षिक योजना तसेच उपलब्ध इतर निधीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी आवश्यक मंजुरी प्रस्ताव तात्काळ सादर करण्यासही सांगितले.

रुग्णालयातील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नमूद केले. आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.

यावेळी बाह्यरुग्ण विभाग, प्रसूती सेवा, प्रयोगशाळा, औषध भांडार, प्रधानमंत्री आयुष्मान भारत कार्ड योजना, रुग्णालयातील विविध आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या एकूण कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रुग्णांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन प्रक्रियेच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी दर पंधरवड्याला बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व आरोग्य उपकेंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व त्याबाबतचे अहवाल वेळेत सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.

या कामात हलगर्जीपणा अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. डिसेंबर 2026 अखेरपर्यंत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानांकन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, सर्व संबंधितांनी या कामास सर्वोच्च प्राधान्य देऊन गुणवत्तावृद्धीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

*****

No comments:

Post a Comment