19 June, 2026

पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धडक तपासण्या करा – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 


 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यात गर्भलिंग निदान व अनधिकृत गर्भपाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची नियमित आणि अचानक तपासणी करून आवश्यक तेथे कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी टास्क फोर्सची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा (पीसीपीएनडीटी) अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

राज्यात तसेच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा वापर वाढत असल्याची बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा व तालुका समुचित प्राधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, वेळोवेळी केंद्रांना भेटी देऊन तपासण्या कराव्यात आणि आवश्यक त्या कायदेशीर कारवाया कराव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीत जिल्ह्याच्या लिंगगुणोत्तर प्रमाणाचा आढावा घेण्यात आला. सन 2023 मध्ये हे प्रमाण 1000 मुलांमागे 897 मुली इतके होते. सन 2024 मध्ये ते वाढून 1000 मुलांमागे 961 मुली इतके झाले असून यात 64 अंकांची वाढ झाल्याची माहिती देण्यात आली.

पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची त्रैमासिक तसेच अचानक तपासणी करण्याचे, तसेच आवश्यकतेनुसार स्टिंग ऑपरेशन व डिकॉय केसेस राबविण्याच्या सूचना सर्व समुचित प्राधिकाऱ्यांना देण्यात आल्या. अनधिकृत गर्भपात रोखण्यासाठीही विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश देण्यात आले.

गर्भलिंग निदानाविरोधात सामाजिक स्तरावर व्यापक जनजागृती करण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. बक्षीस योजना, तक्रार नोंदणीची सुविधा, संकेतस्थळ आणि हेल्पलाईन क्रमांक यांची अधिकाधिक प्रसिद्धी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यात यापूर्वी 11 सोनोग्राफी केंद्रांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सध्या 3 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. समुचित प्राधिकाऱ्यांकडून नियमित तपासण्या, धडक मोहिमा आणि जनजागृती उपक्रम राबविले जात असून समाजात मुलींचे महत्त्व पटवून देण्यासाठी समुपदेशनही केले जात आहे.

गर्भलिंग निदान किंवा अनधिकृत गर्भपाताबाबत माहिती असल्यास नागरिकांनी www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर किंवा हेल्पलाईन क्रमांक 18002334475 वर तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

*******

No comments:

Post a Comment