18 June, 2026

एकल महिला धोरणासाठी अभिप्राय देण्याचे आवाहन


* जिल्हा परिषदेकडून व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध




हिंगोली(जिमाका), दि. 18 : राज्यातील एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा व हक्कांचा विचार करून प्रभावी, समावेशक आणि उपयुक्त एकल महिला धोरण तयार करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत नागरिकांकडून अभिप्राय मागविण्यात येत आहे. यासाठी 8208589195 हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी तयार करण्यात येणाऱ्या धोरणात सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा असून, संबंधित महिलांनी तसेच नागरिकांनी आपले अभिप्राय, सूचना व अपेक्षा या क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर व्हॉट्सअॅप क्रमांकावर एकल महिलांच्या अडचणी व समस्या, शासनाकडे करावयाच्या सूचना व शिफारसी, योजना व धोरणांबाबतच्या अपेक्षा, तक्रारी व अंमलबजावणीतील अडचणी, हक्क, सुविधा व कल्याणकारी योजनांबाबत सूचना पाठविता येईल.  

प्राप्त होणारा प्रत्येक अभिप्राय एकल महिला धोरण अधिक प्रभावी, सर्वसमावेशक व उपयुक्त बनविण्यास मदत करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त एकल महिलांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले मत नोंदवावे, तसेच हा संदेश इतर एकल महिलांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करावेत, असे निर्देश दिले आहेत. 

“एकल महिला शक्तीचा आधार, नवीन उद्याचा विचार” या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांचा सहभाग बदल घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

********

No comments:

Post a Comment