10 June, 2026

हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एनसीडीईएक्स मानकांबाबत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे शेतकऱ्यांना आवाहन

 




हिंगोली (जिमाका), दि. 10 : हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात सुमारे 10 लाख क्विंटल हळद उत्पादन होत असून, हळद हे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे महत्त्वाचे पीक आहे. हळदीच्या उत्पादनाला अधिक चांगला बाजारभाव मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी राष्ट्रीय कमोडिटी व डेरिव्हेटिव्ह्ज एक्स्चेंज लिमिटेड (एनसीडीईएक्स) मानकांनुसार दर्जेदार उत्पादन घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

'एनसीडीईएक्स'च्या गोदामांमध्ये हळद साठवणुकीसाठी माफक दर आकारले जातात. मात्र, हळद 'एनसीडीईएक्स'च्या निर्धारित गुणवत्ता निकषांनुसार असणे आवश्यक आहे. अनेकदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार होणाऱ्या हळदीची गुणवत्ता आवश्यक मानकांशी जुळत नसल्याने माल नाकारला जातो. परिणामी शेतकऱ्यांना गोदामांमध्ये साठवणूक करण्यास अडचणी निर्माण होतात. 

हळद शिजवण्याच्या प्रक्रियेदरम्यान योग्य तापमान राखले जात नसल्याने गुणवत्तेवर परिणाम होतो आणि माल नाकारण्याचे प्रमाण वाढते. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामध्ये हळद उत्पादन, प्रक्रिया, गुणवत्ता निकष, साठवणूक, एनसीडीईएक्स मानके तसेच बाजारपेठेतील आवश्यक गुणवत्ता निकषांविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी हळदीच्या उत्पादनापासून प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आवश्यक मानकांचे पालन केल्यास दर्जेदार उत्पादन मिळून बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळू शकतो. तसेच एनसीडीईएक्स मानकांनुसार माल स्वीकारला जाऊन साठवणूक व विक्री प्रक्रियेतही लाभ मिळू शकतो.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व हळद उत्पादक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन दर्जेदार हळद उत्पादनासाठी आवश्यक बाबींची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्याना वायदेबाजाराची ओळख व हळद गुणवत्ता आधारित जिल्हास्तरीय प्रशिक्षण  कार्यक्रमाचे  गुरुवार, दि. 11 जून, 2026 जिल्हाधिकारी  कार्यालयातील  जिल्हा  नियोजन  समितीच्या सभागृहात सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 वाजता पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रोहन धांडे (मो. 9130897105) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

******



No comments:

Post a Comment