30 October, 2026

निवृत्तीवेतनधारकांनी 1 नोव्हेंबरपूर्वी हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन

*डिजिटल जीवन प्रमाणपत्रासाठी जीवनप्रमाण प्रणालीचा* 
*लाभ घेण्याचे कोषागार अधिकाऱ्यांचे आवाहन*

हिंगोली (जिमाका), दि. ३० : महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ३३५ नुसार राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी दरवर्षी १ नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी विहित पद्धतीने हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

निवृत्तीवेतनधारक किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेमार्फत निवृत्तीवेतन घेतात, त्या बँकेच्या माध्यमातून हयातीचा दाखला जिल्हा कोषागार कार्यालयात सादर केला जातो. तसेच शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक निवृत्तीवेतनधारकांनी ‘जीवनप्रमाण’ प्रणालीद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करावे.

डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करताना निवृत्तीवेतनधारकांनी बँक खाते क्रमांक, पीपीओ क्रमांक अचूक नमूद करावा. तसेच ‘Sanctioning Authority’ या पर्यायामध्ये ‘State Government of Maharashtra’ आणि ‘Disbursing Authority’ या पर्यायामध्ये ‘Maharashtra State Treasury’ निवडून कोषागाराच्या नावासाठी ‘Hingoli’ हा पर्याय अचूक निवडावा.

तरी सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment