५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक
तिसऱ्या दिवशी २० इच्छुकांनी घेतले ४० नामनिर्देशन पत्रे; दोन उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल
आतापर्यंत ६६ इच्छुकांना ११५ नामनिर्देशन पत्रांचे वितरण
छत्रपती संभाजीनगर, दि. १ : ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-२०२६ साठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आज तिसऱ्या दिवशी २० इच्छुक अर्जदारांना एकूण ४० नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच, आज दोन उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
आज नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये कृष्णा त्रिंबकराव पवार (महा जनता परिवर्तन पार्टी) आणि बाळासाहेब भुजंगराव उगले (अपक्ष) यांचा समावेश आहे.
नामनिर्देशन प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजअखेर एकूण ६६ इच्छुक व्यक्तींना ११५ नामनिर्देशन पत्रांचे वितरण करण्यात आले आहे. यापैकी आजअखेर दोन उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी, ५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ यांच्याकडे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.
शनिवार, दि. ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालयातील नामनिर्देशन कक्ष नामनिर्देशन पत्रांचे वाटप व स्वीकारण्यासाठी सुरू राहणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असून, ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.
---
No comments:
Post a Comment