‘माझी वसुंधरा’ अभियान व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपरिषद हिंगोलीच्यावतीने आयोजन
हिंगोली, दि. ३० : पर्यावरणाचे संरक्षण, हरित क्षेत्रात वाढ आणि स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शहरनिर्मितीच्या उद्देशाने स्वच्छ सर्वेक्षण २०२६-२७ तसेच ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही वृक्षारोपणात सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
नगरपरिषद हिंगोलीच्या वतीने आयोजित या उपक्रमातून शासकीय कार्यालयांच्या परिसरात हरित क्षेत्र विकसित करण्यासोबतच नागरिकांमध्ये वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. वाढते शहरीकरण, पर्यावरणीय असमतोल आणि बदलते हवामान यांचा विचार करता वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या झाडांचे संगोपन व संवर्धन करणेही महत्त्वाचे आहे. या दृष्टीने नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या माध्यमातून पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या निसर्गाच्या पंचतत्त्वांचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने स्वच्छता, हरित परिसर आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवून नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर दिला जात आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्राजंली मुंडे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment