21 October, 2026

पाणीटंचाई रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत १०० जलतारा प्रकल्प साठयांची निर्मिती करा

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश; चारा उपलब्धता वाढविण्यावरही भर

हिंगोली, दि. २१ (जिमाका) : औंढा नागनाथ तालुक्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीत पाणी व चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने उपाययोजना कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान १०० जलतारा प्रकल्प साठ्यांची निर्मिती करावी, तसेच ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

औंढा नागनाथ येथील पंचायत समिती सभागृहात ग्रामपंचायत अधिकारी व तलाठी यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत तालुक्यातील पाणी उपलब्धता, चारा नियोजन आणि संभाव्य टंचाईच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्यावे. पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी कुरण लागवडीला प्रोत्साहन द्यावे. जिल्ह्याबाहेर चारा वाहून नेण्यावरील बंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. पाण्याचा अनधिकृत उपसा रोखण्यासाठी तलाठ्यांनी आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

गावपातळीवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दर शुक्रवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घ्यावी. टंचाईसंदर्भातील समस्यांचे तातडीने निराकरण करून कार्यवाहीचा अहवाल नियमित सादर करावा. बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. अधिग्रहण केलेल्या बोअर आणि विहीर पासून 500 मीटर अंतरावर कुठलाही बोअर किंवा विहीर घेता येणार नाही त्याचबरोबर पाण्याचे स्रोत जीओ टॅगिंग करून घ्यावे, ऑगस्ट 2027 महिना पर्यंत पाणी पुरेल याच नियोजन करावे, गावात जनावरे किती गावात चारा किती प्रमाणात उपलब्ध आहे याची माहिती घ्या असेही निर्देश यावेळी देण्यात आले. सोयाबीन कुटार बाहेर जात असेल तर त्यावर कार्यवाही करावी असे निर्देश यावेळी देण्यात आले.

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरीश गाढे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, गटविकास अधिकारी गोपाल कल्हारे, सहायक गटविकास अधिकारी अनंता घोरपडे,, तालुका कृषी अधिकारी शिवप्रसाद संगेकर, पशुसंवर्धन विभागाचे पारवेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment