हिंगोली जिल्हा परिषदेत राज्य सेवा हक्क आयोगाची आढावा बैठक
हिंगोली, (दि. १३):-येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज छत्रपती संभाजीनगरचे राज्य सेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त डॉ. किरण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषदेअंतर्गत नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांना सर्व शासकीय सेवा दर्जेदार, पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने मिळण्यासाठी १०० टक्के सेवा ऑनलाईन देण्याच्या सूचना आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.
*डिजिटल उपक्रमांचे कौतुक*
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने विकसित करण्यात आलेल्या 'व्हॉट्सॲप चॅटबॉट' आणि 'इंटर डिपार्टमेंटल ॲप' या नाविन्यपूर्ण डिजिटल सुविधांची माहिती बैठकीत देण्यात आली. नागरिकांना या तंत्रज्ञानाचा वापर करून सहजरित्या शासकीय योजना व सेवांचा लाभ कसा घेता येतो, याचे प्रात्यक्षिक व माहिती सादर करण्यात आली.
*राज्यस्तरीय पुरस्कारांमुळे जिल्हा परिषदेचे अभिनंदन*
हिंगोली जिल्हा परिषदेला यापूर्वी १५० सेवा कर्मी कार्यक्रम, आय-गॉट (iGOT) कर्मयोगी, पोषण टँकर अभियान आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या चार महत्त्वाच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आयुक्त डॉ. किरण जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
*बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे व जिल्हा परिषदेची कामगिरी:*
शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या १७० शिक्षकांना पदोन्नती देऊन केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.
आरोग्य विभागातील जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी १२ आणि १३९ आरोग्य उपकेंद्रांपैकी ५० आरोग्य संस्थांची राष्ट्रीय गुणांकन मानांकनासाठी पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे. डीसीपीएस अंतर्गत १ हजार शिक्षकांपैकी ९०० शिक्षकांचे एनपीएस मध्ये यशस्वीरीत्या ट्रान्सफर करण्यात आले आहे.
ई-ऑफिस व प्रलंबित प्रकरणे: जिल्ह्यात ई-ऑफिसचा प्राधान्याने वापर केला जात असून, दर आठवड्याला बैठका घेऊन प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढली जात आहेत.
*बचत गटांची लंडनपर्यंत धडक*
महिला बचत गटांमार्फत ऑनलाईन माध्यमातून २२ प्रकारची हळदीचे उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या उत्पादनांना लंडनसारख्या परदेशातून मागणी येत आहे. जिल्ह्यात बचत गटांना पॅकेजिंग मशीनचे वाटप करण्यात आले असून, हिंगोली जिल्ह्यातील 'यलो गोल्ड' चे काम अत्यंत प्रशंसनीय आणि अभिनंदनास पात्र असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
जिल्ह्यातील ३१ हजार एकल महिलांना शासनाच्या विविध सामाजिक व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व इतर आवश्यक प्रमाणपत्रे शाळास्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घ्यावा, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
*१७ ऑक्टोबर रोजी 'बुक डोनेशन कॅम्प'चे आयोजन*
मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या संकल्पनेतून येत्या १७ ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी 'बुक डोनेशन कॅम्प' चे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळील वाचून झालेली पुस्तके या कॅम्पमध्ये जमा करायची असून, त्याचा प्रत्यक्ष फायदा गरजू विद्यार्थ्यांना होणार आहे.
या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृद्धी दिवाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगंबर माडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) विजय बोराटे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र पुरी, शिक्षणाधिकारी मंजुश्री कल्लेवाड, विपुल भागवत, संदीप सोनटक्के, कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी बुचाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीचे आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी केशव गडापोड यांनी मानले.
*******
No comments:
Post a Comment