23 October, 2026

हिंगोली जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी शांततेत मतदान


सायंकाळी ४ वाजेपर्यंत अंदाजित ६१.५८ टक्के मतदान

हिंगोली, दि. २३ ऑक्टोबर (जिमाका) : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया सायंकाळी ४ वाजेपर्यंत शांततेत व सुरळीत पार पडली. जिल्ह्यातील सर्व ३६ मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्ह्यात  अंदाजित ६१.५८ टक्के मतदान झाले.

जिल्ह्यात सकाळी ८ ते १० या कालावधीत ६.६३ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत १९.८८ टक्के, तर दुपारी २ वाजेपर्यंत ३७.९४ टक्के मतदान झाले होते. मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडले.

जिल्ह्यातील एकूण ३६ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार यादीतील एकूण १० हजार ३१५ मतदारांपैकी ६ हजार ३५२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये  ८ हजार ३३७ पुरुष मतदारांपैकी ५ हजार ३५८ जणांनी, तर १ हजार ९७८ महिला मतदारांपैकी ९९४ महिलांनी मतदान केले. महिला मतदारांच्या तुलनेत पुरुष मतदारांचा सहभाग अधिक राहिला.

जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वेबकास्टिंगची व्यवस्था करण्यात आली होती. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी वेबकास्टिंगच्या माध्यमातून सर्व मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेची पाहणी केली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्या व साहित्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रगती चोंडेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील सर्व सबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment