03 November, 2026

एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी क्रमांकपट्टी बसविणे बंधनकारक

क्रमांकपट्टी न बसविल्यास दंडात्मक कारवाईसह वाहनविषयक विविध सेवांवर निर्बंध

हिंगोली, दि. ३ (जिमाका) : जिल्ह्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. एचएसआरपी बसविण्याची निर्धारित मुदत संपुष्टात आली असून, १ जुलै २०२६ पासून अशा क्रमांकपट्ट्या न बसविलेल्या वाहनांवर वायुवेग पथकांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. यापुढेही एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मरगू जाधव यांनी दिली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० नुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी बसविण्याची तरतूद आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. १३०२९/१९८५ (एम.सी. मेहता विरुद्ध केंद्र शासन) या प्रकरणात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत.

एचएसआरपी न बसविलेल्या वाहनांच्या मालकांना वाहन हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे आदी कामांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अशा वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल आणि परवाना नूतनीकरण यांसारखी कामे थांबविण्यात येणार आहेत. यात योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास अपवाद ठेवण्यात आला आहे.

तरी हिंगोली जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांना तातडीने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी बसवून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश मरगू जाधव यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment