02 November, 2026

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडून वसमत महिला व बाल रुग्णालयाची पाहणी;

'RBSK' योजनेमुळे पुनर्जन्म मिळालेल्या पाच महिन्यांच्या चिमुकलीला उचलून घेत केले कौतुक
वसमत: दि.02 -राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी 'आरोग्य संवाद यात्रा'' च्या निमित्ताने वसमत येथील महिला व बाल रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान 'राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमा'मुळे (RBSK) दुर्धर आजारावर मात केलेल्या पाच महिन्यांच्या सिया गौतम भंडारे या चिमुकलीला आरोग्य मंत्र्यांनी स्वतःच्या कडेवर उचलून घेत तिच्या प्रकृतीची अत्यंत आपुलकीने विचारपूस केली. हा हृदयस्पर्शी क्षण उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

सिया अवघ्या १० दिवसांची असताना तिच्यावर मुंबईतील नामांकित कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अत्यंत गुंतागुंतीची ‘बॅड क्लोजर विथ आर्च रिपेअर’ (Bad Closure with Arch Repair) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली होती. शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार मिळून चिमुकली आज ठणठणीत असल्याने आरोग्य मंत्र्यांनी समाधान व्यक्त करत तिच्या पालकांना दिलासा दिला व डॉक्टरांच्या अभिनंदन केले.
या पाहणी दौऱ्यात आरोग्य मंत्र्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची तपासणी करून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेतला. सामान्य नागरिकांना, माता व बालकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळायलाच हव्यात, अशा सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

No comments:

Post a Comment