04 November, 2026

जिल्हाधिकाऱ्यांची बावनखोली जिल्हा परिषद शाळेला सदिच्छा भेट

 

विद्यार्थ्यांशी इंग्रजी व्याकरणातील ‘टेन्स’ विषयावर संवाद; शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा

        हिंगोली, दि. ४ (जिमाका) : हिंगोली शहरातील बावनखोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज सदिच्छा भेट देऊन शैक्षणिक कामकाजाची पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी विषयातील आकलनाची पडताळणी करत अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता आणि शाळेतील विविध सुविधांचा आढावा घेतला.

        शाळेत आगमनानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी थेट वर्गात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. इंग्रजी व्याकरणातील ‘टेन्स’ अर्थात वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या घटकावर चर्चा करून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची उजळणी घेतली. विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे आणि विषयाचे आकलन जाणून घेत त्यांनी इंग्रजी विषयातील गुणवत्तावाढीवर भर दिला.

अध्यापन पद्धतींची पाहणी

        विद्यार्थ्यांशी संवादानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी शिक्षकांच्या अध्यापन पद्धतींचा आढावा घेतला. इंग्रजी व्याकरणातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी शिक्षक कोणत्या पद्धतींचा आणि शैक्षणिक साहित्याचा वापर करतात, याची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना विषय सहज समजावा आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढावे, यासाठी शिक्षकांनी केलेल्या प्रयत्नांची त्यांनी दखल घेतली.

        यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधा आणि राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांचीही पाहणी करण्यात आली. शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी आवश्यक सूचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन आणि विद्यार्थ्यांचे आकलन जाणून घेण्याच्या उद्देशाने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.

No comments:

Post a Comment