06 March, 2025

बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संपर्क साधावा

हिंगोली (जिमाका), दि. 06 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बाल विकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, गरजू, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो. या योजनेचा लाभ एका कुटुंबातील दोन बालकांना देण्यात येतो. अर्ज केल्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशाने जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत या बालकांची सामाजिक तपासणी अहवाल बाल कल्याण समितीस सादर करण्यात येतो व त्यानंतर कुटुंबाच्या सर्वांगीण परिस्थितीचा विचार करून लाभार्थ्यांस बाल संगोपन योजनेचा लाभ मंजूर करण्यात येतो. बाल संगोपन योजना ही महिला व बाल विकास विभागाअंतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांच्या पालकांनी स्वत: आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवती प्रशासकीय इमारत, नांदेड रोड, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. *****

No comments:

Post a Comment