06 March, 2025

औंढा (नागनाथ) येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

हिंगोली, (जिमाका) दि.०६: राष्ट्रीय आरोग्य अभियान व केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या विशेष मोहिमेचे उद्घाटन ०१ मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते राज्यस्तरावर करण्यात आले. त्या अनुषंगाने नागेश्वर प्राथमिक विद्यालय, औंढा नागनाथ येथे राज्यस्तरीय सोहळ्याचे थेट प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम, डॉ. शैलजा कुपऻस्वामी, डॉ. पांडुरंग फोपसे, आर. बी. एस. के. जिल्हास्तरीय पर्यवेक्षक लक्ष्मण गाभणे, श्री. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली औंढा नागनाथ येथील नागेश्वर प्राथमिक विद्यालयात तालुकास्तरीय उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागेश्वर प्राथमिक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण 466 पैकी 458 बालके तपासण्यात आले. किरकोळ आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना औषधोपचार करण्यात आले. तसेच गंभीर आजार असणाऱ्या बालकांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय औंढा नागनाथ व जिल्हा रुग्णालय हिंगोली येथे संदर्भित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कल्पना सुनतकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, गटशिक्षणाधिकारी गंगाधर साखरे, बालविकास प्रकल्प अधिकारी संगीता इंगळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक इंगळे व सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. विशेष तपासणी मोहीम मार्च महिनाभर राबविण्यात येणार असून या मोहिमेत शालेय व अंगणवाडी बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.या आरोग्य तपासणी मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ****

No comments:

Post a Comment