06 March, 2025

राष्ट्रीय नमुना पाहणी सर्वेक्षण क्षेत्रकाम नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 06 : भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 80 व्या फेरीचे क्षेत्रकाम माहे जानेवारी ते डिसेंबर, 2025 या कालावधीत होणार आहे. या फेरी अंतर्गत सर्वे ऑन सोशियल कझप्शन-हेल्थ या विषयावर पाहणी घेण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाचा उद्देश आरोग्य क्षेत्राविषयी मूलभूत सांख्यिकी माहिती गोळा करणे, शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवांच्या वापराचे मोजमाप करणे, सरकारी रुग्णालयांचा वापर किती प्रमाणात होतो, सरकारी व खाजगी क्षेत्रातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, आऊट ऑफ पॉकेट एक्सपेंडीचर, सर्व वयोगटातील व्यक्तीचे लसीकरण, 15 ते 49 वयोगटातील गरोदर महिलांसाठी प्रसूती आणि प्रसूतीपूर्व व प्रसूती नंतर घेतलेल्या उपचारांबाबत तपशीलवार माहिती या सर्वेक्षणाद्वारे गोळा केली जाणार आहे. वरील विषयांवर माहिती गोळा करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील घर, इमारत, जागा यांची रँडम पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे. 80 व्या फेरीच्या क्षेत्रकामासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी निवड झालेल्या घर, इमारत, जागा याठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून माहिती संकलित करणार आहेत. सर्वेक्षणाविषयी योग्य माहिती मिळविण्याच्या दृष्टीने कुटुंबप्रमुखांची भेट होणे गरजेचे आहे. यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना रविवार व सुट्टीच्या दिवशी देखील काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयामार्फत होणाऱ्या 80 व्या फेरीच्या क्षेत्रकामाच्या अनुषंगाने भेट देणाऱ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. 80 व्या फेरीकरीता संकलित करण्यात आलेली सर्व माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक यांनी दिली आहे. *******

No comments:

Post a Comment