10 March, 2025
महिला बचतगटाच्या तीन दिवशीय विक्री प्रदर्शनाचा समारोप
• उत्कृष्ट महिला बचतगटांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत महावीर भवन येथे दि. 8 मार्च ते 10 मार्च तीन दिवसीय महिला बचतगट विक्री प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोपीय कार्यक्रम आज घेण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक बालाजी शिंदे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मगर यांनी महिलांनी अधिक चांगल्या प्रकारे आपले व्यवसाय करुन आर्थिक प्रगती साधावी, असे प्रतिपादन केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक बालाजी शिंदे महिलांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत विविध योजना आणि त्या करिता लागणारे कागदपत्र याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हा प्रकल्प सल्लागार गजानन खिरोडकर यांनी महिलांनी आपले व्यवसाय अधिक चांगले कसे करता येतील याबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीएमआरसी व्यवस्थापक विलास पंडित यांनी केले तर आभार स्वप्नपूर्ती सीएमआरसीचे व्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट महिला बचत गटांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच या प्रदर्शनीमध्ये इतर सहभागी महिला बचतगटांचा देखील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाकरिता सर्व व्यवस्थापक, लेखापाल, विकास सल्लागार तसेच, सर्व सहयोगीनीपी परिश्रम घेतले. त्याचबरोबर संतोष ठाकूर, रफिक शेख यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
********
No comments:
Post a Comment