19 December, 2025
मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात कलम 163 लागू
हिंगोली, दि.१९ (जिमाका) :हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद निहाय मतमोजणी प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मतमोजणी केंद्र व त्याच्या आजूबाजूच्या परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू केले असल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी आदेश निर्गमित केले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक–2025 साठी दिनांक 04 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषदांसाठी मतदान दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी पार पडले असून, सुरुवातीस दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार होती. मात्र, काही नगरपरिषद व नगरपंचायतीं संदर्भात न्यायालयीन अपील दाखल झाल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांच्या आदेशानुसार दिनांक 29 नोव्हेंबर 2025 रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 21 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहणार आहे.
या आदेशानुसार मतमोजणी केंद्रापासून 100 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालये, उमेदवारांचे मंडप, दुकाने, मोबाईल, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व स्मार्ट वॉचेस यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच निवडणुकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहनांना प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
तसेच मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात नियुक्त अधिकारी व कर्मचारी वगळता पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. संबंधित पक्षांच्या उमेदवारांची चिन्हे प्रदर्शित करण्यास तसेच वैध ओळखपत्रांशिवाय कोणालाही मतमोजणी केंद्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
हे आदेश निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाहीत. हे आदेश दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्रपणे आदेश तामिल करणे शक्य नसल्याने भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 च्या कलम 163 अन्वये हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला असल्याचे जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
*******

No comments:
Post a Comment