19 December, 2025
नगर परिषद निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात कलम 163 लागू : मतदानकेंद्र परिसरात निर्बंधांचे आदेश
हिंगोली, दि. १९ (जिमाका) :
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक–2025 साठी दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, त्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नगर परिषद निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यात कलम 163 लागू करण्यात आले असून, मतदानकेंद्र परिसरात निर्बंधांचे आदेश निर्गमित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदांसाठी मतदान दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आले होते. मात्र काही नगर परिषद व नगरपंचायती संदर्भात न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव यांच्या आदेशानुसार सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सुधारित कार्यक्रमानुसार मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 21 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आला असून, आदर्श आचारसंहिता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत लागू राहणार आहे. त्यानुसार दिनांक 04 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत आचारसंहितेचा कालावधी वाढविण्यात आला आहे. तसेच हिंगोली व वसमत शहरातील स्थगित प्रभागांसाठी दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद हिंगोली, वसमत व कळमनुरी येथील मतदान केंद्रे व त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात सर्व पक्ष कार्यालये, उमेदवारांचे मंडप, दुकाने, मोबाईल व कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे व स्मार्ट वॉचेस, निवडणूक कामाव्यतिरिक्त खाजगी वाहने, तसेच संबंधित पक्ष किंवा उमेदवारांच्या चिन्हांचे प्रदर्शन व निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तींचा प्रवेश यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.
भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये प्राप्त अधिकारांन्वये स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक–2025 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील संबंधित मतदान केंद्रे व त्यांच्या 200 मीटर परिसरात वरील सर्व बाबींवर प्रतिबंध राहील, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्गमित केले आहेत.
हे आदेश दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेपासून दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषद हद्दीत अंमलात राहतील. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी सभा, बैठका किंवा प्रचार मोहीम राबविण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीस वैयक्तिकरित्या आदेश तामील करणे शक्य नसल्यामुळे भारतीय नागरी सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये हा एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
*****

No comments:
Post a Comment