18 December, 2025

जिल्हा नियोजन कार्यालयात अल्पसंख्याक हक्क दिन साजरा

हिंगोली, दि. १८ (जिमाका) : अल्पसंख्याक समाजाच्या घटनात्मक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा नियोजन कार्यालयात आज अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र संघटनेने 18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. त्या अनुषंगाने दरवर्षी 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. अल्पसंख्यांक समाजाला त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी, यासाठी अल्पसंख्यांक विकास विभाग, जिल्हा नियोजन समिती यांच्यामार्फत अल्पसंख्यांक दिन आज साजरा करण्यात आला. अल्पसंख्यांक व बहुसंख्यांक यांच्यात परस्पर सलोखा व सदभाव कायम ठेवणे महत्त्वाचे असून लोककल्याणकारी दृष्टिकोनातून सर्वांनी यासाठी प्रयत्न करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. भारतात विविधतेत एकता आहे. राज्यघटनेतील कलम 29 व 30 अंतर्गत अल्पसंख्यांकांसाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन अनेक उपक्रम राबवित आहे. यावेळी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस. एम. रचावाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे तसेच प्रदीप नळगीरकर उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मनोगतात अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण, समान संधी आणि सर्वसमावेशक विकास या बाबी अधोरेखित केल्या. कार्यक्रमाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी शासन राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून सर्वांनी एकत्रितपणे समाजात समता, बंधुता व न्याय मूल्यांची जोपासना करण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सहायक संशोधन अधिकारी अतिवीर करेवार, सूत्रसंचालन एस. एस. धारे यांनी तर आभार एम. एस. शेख यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा नियोजन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments:

Post a Comment