हिंगोली (जिमाका),
दि. 9 : महिला व बालविकास विभागाच्या वतीने येथील शहरातील बियाणी नगरमधील शाळेत विद्यार्थ्यांसाठी
बाल हक्क, बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध तसेच शासकीय योजनांविषयी जनजागृती कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात जिल्हा
बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे मूलभूत हक्क, शिक्षणाचा
हक्क, संरक्षणाचा हक्क आणि सहभागाचा हक्क याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच बालविवाह
प्रतिबंधक कायदा, 2006 अंतर्गत बालविवाहाचे दुष्परिणाम, कायदेशीर तरतुदी आणि बालविवाह
रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी
जागरूक नागरिक म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले.
जिल्हा प्रकल्प समन्वयक
संदीप कोल्हे यांनी चाईल्ड हेल्पलाइन 1098 या राष्ट्रीय आपत्कालीन सेवेची माहिती देताना,
संकटात सापडलेली, अत्याचारग्रस्त, बेवारस, हरवलेली किंवा संरक्षणाची गरज असलेली बालके
यांच्यासाठी ही सेवा 24 तास उपलब्ध असल्याचे सांगितले. कोणत्याही बालकावर अन्याय होत
असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ 1098 वर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
समुपदेशक अंकुर पाटोडे
यांनी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, बाल संरक्षण
सेवा, समुपदेशन सुविधा तसेच गरजू व संकटग्रस्त बालकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या
सेवांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कांविषयी जागरूक
राहण्याबरोबरच इतर बालकांनाही योग्य माहिती देऊन समाजात जनजागृती निर्माण करण्याचे
आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी
आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षिका शुभांगी नाईक, एस. आर. देसाई, एस.
आर. चव्हाण आणि सर्व शिक्षकवृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास शाळेतील मोठ्या संख्येने
विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून
आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
या जनजागृती कार्यक्रमामुळे
विद्यार्थ्यांमध्ये बाल हक्क, बाल संरक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि शासकीय योजनांविषयी
जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली, असा विश्वास महिला व बालविकास विभागाने व्यक्त
केला.
******
No comments:
Post a Comment