हिंगोली, दि. १७ (जिमाका) : हिंगोली जिल्ह्यातील पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, पुरावे तसेच अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजित शिबिरांमध्ये शिरड शहापूर, ता. औंढा येथे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. आखाडा बाळापूर व साळवा, ता. कळमनुरी येथे ३ अर्ज, हत्ता साखरा, गोरेगाव व बाभूळगाव, ता. सेनगाव येथे १८ अर्ज प्राप्त झाले. तसेच हिंगोली शहर व ग्रामीण, ता. हिंगोली, टेंभुर्णी व गिरगाव, ता. वसमत येथे एकही अर्ज प्राप्त झाला नाही.
या शिबिरांमध्ये कुणबी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, जुन्या महसुली अभिलेखांमधील नोंदी, वंशावळ तयार करण्याची पद्धत, उपलब्ध पुराव्यांचे महत्त्व तसेच जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची कार्यपद्धती याबाबत नागरिकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी आणि आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याबाबतही मार्गदर्शन केले जात आहे.
नागरिकांनी आपल्याकडे उपलब्ध असलेले जुने महसुली अभिलेख, शैक्षणिक अभिलेख, जन्म-मृत्यू नोंदी, कुटुंबातील पूर्वजांच्या जात नोंदी, वंशावळीसंबंधी कागदपत्रे तसेच इतर उपलब्ध पुरावे घेऊन संबंधित मंडळ स्तरावरील शिबिरास उपस्थित राहावे.
हिंगोली जिल्ह्यातील महसूल मंडळनिहाय शिबिरांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, संबंधित मंडळातील नागरिकांनी आपल्या मंडळासाठी निश्चित केलेल्या दिनांक व वेळेनुसार शिबिराचा लाभ घ्यावा.
कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या नागरिकांनी या विशेष शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment